Navnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण


Navnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर

Navnath Katha Prarambh

आदेश मच्छिंद्रगुरूदत्ता!!!

रम्य वनश्रीने नटलेल्या….गर्द गीर च्या जंगलाने वेढलेल्या…सिंह-व्याघ्र यांचे निवासस्थान असलेल्या परमपवित्र गिरनार पर्वतराजी मधील कथा….

नुकताच वर्षा ऋतू सरलेला…सगळीकडे हिरवळ पसरलेली अशा उन्मादक वातावरणात मच्छिंद्र ध्यान लावून बसलेले …
दत्त महाराजांची स्वारी आली गुरू शिखरावर. मच्छिंद्रनाथांनी नेत्र उघडले आणि दत्तात्रेयांना आदेश केला. दत्त म्हणाले “मच्छिंद्रा वातावरण बघ कीती मोहक झालंय! मला वनविहार करण्याची प्रबळ इच्छा होते आहे. ह्या माझ्या प्रिय गिरनार चे सौंदर्य बहरून आले आहे. चल ऊठ आपण फेर फटका मारून येऊ.”
मच्छिंद्रनाथ म्हणाले “प्रभो मी आपला प्रिय पुत्र आहे. आपली ईच्छा पूर्ण करणे माझे भाग्यच होय.”

navnath
दोघेही गुरूशिखरावरून खाली उतरू लागले…वाटेत एक श्वान त्यांच्या सोबत येऊ लागला.
थोड्याच वेळात ते दोघेही खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले.
वनराज सिंहाने डरकाळी फोडून दोघांना आदेश करण्याचा प्रयत्न केला!
वनराई चे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले. एका औदुंबर वृक्षाच्या छायेत बसले…
मच्छिंद्रनाथांना म्हणाले…”पुत्रा किती वर्ष माझ्यापासून व आपल्या ह्या गिरनार पासून तू दूर राहिलास! किती प्रसंग सोसलेस बाळा! जगाच्या कल्याणासाठी दारोदार फिरलास…भिक्षेच्या रूपात लोकांचे दैन्य-दुःख झोळीत घेतलेस. मायास्वरूपात जरी स्त्री राज्यात गेलास तरी लोकांचे बोल तुला सोसावे लागले. मन कापून ऊठते जेव्हा लोक म्हणतात पहा दत्त पुत्र नाथपंथाचा निर्माता अध्वर्यू मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाऊन सुख भोगून आला! असं वाटत की माझ्या हातात फिरणारे हे सुदर्शन चक्र सोडून आत्मरंध्राची किंकाळी फोडत त्या लोकांचे शीर धडावेगळे करावे! पण नियतीपुढे मलाही झुकावे लागते. गोरक्षाने तुला स्त्री राज्यातून सोडवून आणले…माझ्या मनाचे समाधान केले….न जाणो किती वर्षे झाली रे तुझे रूप बघून…तुझा आदेशाचा मंजुळ आवाज ऐकून…तुझे तेजस्वी निळे डोळे बघून!
ये बाळ असा दूर का ऊभा? माझे हृदय तुला जवळ घेण्यासाठी तळमळते आहे!”
महाराजांच्या नेत्रातून अश्रूपात होऊ लागला! हे पाहून मच्छिंद्रनाथांना गहिवरून आले…त्यांनी पळत जाऊन अनसूयात्मजाला कंठभेट दिली…काय वर्णावा तो क्षण? माय-लेकरू एकरूप झाले!
थोड्या वेळाने दोघेही स्थिर झाले.
मच्छिंद्रनाथ म्हणाले, “हे करुणानिधी आपण असे भावनाविवश झालेले मला पहावत नाही. तुम्ही जाणता लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनार पासून पुन्हा विलग व्हावे लागणार आहे…
गर्भगिरी पर्वतावर अक्षय निवास करण्याचा माझा विचार आहे! माझा प्रिय पुत्र गोरक्षनाथाला मी इथेच गिरनार वर राहून आपली सेवा करण्याचा आदेश केला आहे.
आम्हा नव नाथांचे देह कार्य समाप्त झाले आहे….आता आम्ही गुप्त रूपात कार्य करणार आहोत. आपली आज्ञा असावी.”

दत्त म्हणाले, “हृदयावर पाषाण ठेवून मला तुला निरोप द्यायला लागत आहे रे. ठीक आहे. जाऊन रहा गर्भगिरी वर. लोक तुला मायबा म्हणूनही ओळखतील. गर्भगिरी पर्वताला मी प्रती गिरनार असण्याचा वर देतो आहे! गिरनार व गर्भगिरी मध्ये काही फरक नाही.
मच्छिंद्रा तु माझेच प्रतिरूप आहेस. तुझे दर्शन म्हणजे माझे दर्शन घेतल्या सारखे आहे. तुला केलेला प्रत्येक नमस्कार हा नऊही नाथांना व मला पोहोचेल. गिरनार वर तु नसूनही असशील माझ्या रूपात आणि गर्भगिरी वर मी नसूनही असेन तुझ्या रूपात.
पण माझी तुला आज्ञा आहे…दर पौर्णिमेला तु गिरनार वर मला भेटायला ये.”
हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, “महाप्रभू आपली आज्ञा शिरसावंद्य! मी अजून काही दिवस गिरनार वर वास करून गर्भगिरी साठी प्रस्थान ठेवेन. जे भक्त गर्भगिरी वर येतील त्यांना आपल्या सांगण्या प्रमाणे गिरनार यात्रेचे फळ मिळेल. गिरनार मुळे जसा गुर्जरदेश (गुजरात) पावन झाला त्याप्रमाणे गर्भगिरी मुळे मराठदेश (महाराष्ट्र) पवित्र होईल.
मी दर पौर्णिमेला गिरनार वर येईन आणि कोणत्याही रूपात माझ्या व आपल्या भक्तजनांना दर्शन देईन.
गोरक्ष माझा प्रिय शिष्य आहे कृपया त्याला कधी अंतर देऊ नये. काही चुकले तर त्याला क्षमा करावे. गोरख शिखरावर तो निरंतर वास्तव्य करेल. त्यास कृपावलंकीत करावे.”

महाराज तथास्तु म्हणाले व मच्छिंद्रासोबत गुरूशिखरावर गेले. काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ गर्भगिरी कडे निघाले…दत्ताने, गोरक्षाने व भर्तुहरीनाथ,गोपीचंदनाथ यांनी मच्छिंद्रनाथांना भावपूर्ण निरोप दिला.

अशाप्रकारे सद्गुरू मच्छिंद्रनाथ गर्भगिरी वर अजूनही वास्तव्यास आहेत.
भक्तांना त्यांच्या वास्तव्याची आजही अनुभूती येत असते.

For more spiritual reading like Navnath Katha on Garbhgiri Hills, please visit our Spirituality Section.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *