Gajra (गजरा)- A Beautiful Short Story – Marathi Laghu Katha


Gajra (गजरा)

“अरे वा! आज चक्क Gajra (गजरा)!”
ती एकदम आश्चर्य चकित होऊन म्हणाली. सध्याच्या  परिस्थितीत त्याच्याकडून एका साध्या कटाक्षासाठी तिला तरसायला लागत होतं. लग्नाला अनेक वर्षे उलटून गेलेल्या अनेक जोडप्यांसारखं त्यांच्यातल्या संवादाची पातळी आणि आपुलकी दोन्ही यथातथा झाली होती. त्यामुळे ह्या छोटयाश्या गोष्टीने सुद्धा तिला खूप आनंद झाला ह्यात काही नवल नव्हते.
gajra
त्याने तिच्या हातात दिलेला गजरा घेतला आणि तिला म्हणाला, “मागे फिर, माळून देतो.” ती हसून वळली. त्याने हलकेच Gajra (गजरा) माळला. तिला खूप छान वाटलं.
लग्ना आधी तिला गजरा कधीच आवडायचा नाही. ती शक्यतो वेस्टर्न कपडे घालायची. त्यामुळे गजरा कधी फारसा माळला जायचा नाही. कधी सणा-समारंभाला आईने सांगितलं तर नाक मुरडायची ती.
पण लग्नानंतर अनेक गोष्टीं सोबत आवडी निवडीही बदलल्या. प्रेमाने सांगितलेल्या गोष्टी सक्तीच्या न वाटता नवऱ्याच्या प्रेमाखातर आवडू लागल्या. नंतर प्रेमाची व्याख्या बदलली किंवा priorities बदलल्या म्हणून सक्ती उरली. असो. ह्या क्षणी तरी छान वाटतंय ना! बास!
“काय बनवलंय आज जेवायला?” त्याने विचारलं.
“अजून सुरुवात नाही केलीये स्वयंपाकाला. काय बनवू सांग.”
“काही नको. आपण आज बाहेर जाऊया जेवायला.”
आणखी एक shock ! ह्याला आज झालंय तरी काय? इतका कसा आज राजा उदार झालाय?
लगेच तिचं दुसरं मन उसळून म्हणालं “काहीही काय? तो काय कंजूष नाहीये.”
माहित आहे. पण आज काहीतरी घडलंय हे नक्की. स्वारी फारच खुशीत दिसत्ये आज. पण तो खुशीत तर आधीही असायचा. पण कधी आपल्याशी इतका चांगला वागला नाही.मग?
काय करावं त्याने? चांगला वागला तरी तुला प्रॉब्लेम, नाही वागला तरी तू उदास. करावं काय त्याने? सगळ्या गोष्टीत संशय घ्यायची मेली सवयच झालीये तुला! आता तो प्रियकरासारखा वागतोय तर तू का टिपिकल
बायको मोड मध्ये आहेस? ऐक ना त्याचं. जा तयार हो मस्तपैकी आणि दोघं छान एन्जॉय करा. नसती खुस्पटं काढत बसलीये!
बरं बरं. एवढं काही बोलायला नको. आज तो काही बोलत नाहीये तर तू मला ऐकवतोय्स का?
ती खुद्कन हसली. तिच्या दोन मनांमधली खडाजंगी संपली होती आणि तिला positive कौल का काय तो मिळाला होता.
तिने त्याच्या आवडीचा पिवळा आणि गुलाबी सलवार कमीझ घातला. केस विंचरून गजरा पुन्हा नीट माळला. दोघे कार ने निघाली. वाटेत तो अखंड गप्पा मारत होता. ती शांतपणे पण लक्ष देऊन ऐकत होती. थोडं अंतर गेल्यावर तिला राहवलं नाही. तिने विचारलंच.
“तुझा मूड खराब करायचा नाहीये मला. पण एक विचारू?”
“अगं विचार ना. माझा मूड आज कशानेही खराब होणार नाहीये.” तो
“आज काय झालंय तुला? अचानक बाहेर जेवायला वगैरे?”
“चालणार आहे ना तुला? तुझी इच्छा नसेल तर आपण घरी जाऊया. मी काहीतरी पार्सल आणतो”
“नाही रे. माझी इच्छा नसायला काय झालंय? पण मघाशी घरी आल्यापासून मी बघतीये, तू खूप आनंदात आहेस. मला सारखं वाटतंय कि आज काहीतरी छान घडलंय तुझ्या सोबत. काय ते सांगितलंस तर त्याचा मलाही आनंदच होईल असं तुला नाही वाटत का?”
“काही नाही  ग. आज आमच्या ऑफिस मध्ये “happiness unlimited ” असा एक सेमिनार होता. त्या माणसाने एक कथा सांगितली. तशी काल्पनिकच म्हणायची. पण त्या कथेचा मी अजूनही विचार करतोय. त्याचा प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमतोय. मनात फिरतोय. अजून.”
“कुठली कथा ?”
तिला आश्चर्य वाटलं. अशी कुठली कथा असेल ह्याला एवढी आवडलेली. ह्याला इम्प्रेस करणं म्हणजे ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यापेक्षा महाकठीण काम. त्याला कधीच कुठली गोष्ट फार अशी आवडत नसे. तिच्या तर प्रत्येक गोष्टीत त्याने लग्नानंतर खोड काढली होती. असो.
तो सांगू लागला,
“फार पूर्वी म्हणे अरब देशात एक इसम रहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. साधा माणूस. पण नेहमी आनंदी आणि समाधानी. सतत चेहऱ्यावर हसू. एके दिवशी त्याला एक कप सापडतो. त्या कपात रडलं की अश्रुंचे मोती तयार होतात हे त्याला कळतं. पण ह्या पठ्ठ्याला कधी रडूच येत नसे. मग तो सतत उदास राहण्याचा प्रयत्न करू लागतो. दुःखाच्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागतो. आणि त्या कपात रडून अश्रुंचे मोती तयार करू लागतो. हळूहळू त्याला ह्या मोत्यांच्या आणि त्यातून येणाऱ्या श्रीमंतीचा मोह होऊ लागतो. त्याचं लग्न होतं. बायकोवर प्रेम खुप. पण बायकोला आनंदी ठेवू शकत नाही. कारण स्वतःला आनंदी राहणं गरजेचं वाटत नसतं. शेवटी तो माणूस मोत्यांच्या डोंगरावर बसून आपण स्वतः संपवलेल्या बायकोच्या प्रेतावर रडतो असा त्या कथेचा शेवट आहे.”
“बापरे” तिच्या अंगावर काटा आला.
” मी खूप विचार केला ह्या कथेचा. म्हटलं यार! आपण आनंद हवा, आनंद हवा म्हणून सगळी कडे भटकत असतो. पण जी माणसं आपली आहेत, आपल्या जवळ आहेत. त्यांच्या सुखात आनंद शोधणं किती सोप्पं आहे. मघाशी एका लहानश्या गजऱ्यानेही तू कित्ती खुश झालीस. तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मलाही खूप बरं वाटलं.”
ती खुदकन हसली पुन्हा. आपला नवरा आपल्यावर मनापासून खूप प्रेम करतो आणि आपल्या सुखासाठी प्रयत्न करतो ही कल्पनाच अत्यंत सुखावणारी आणि positive आहे.
हॉटेल जवळ आल्यावर ती कार मधून उतरली. तो गाडी पार्क करून आला आणि दोघे जिना चढत असताना तिच्यातली बायको पुन्हा जागी झाली.
“काय रे. पण मला एक सांग. मोती मिळवण्यासाठी त्याला उदास राहायची काय गरज होती? रोज कांदा चिरला असता तर ढीगभर मोती मिळाले असते. उगाच त्या बिचाऱ्या बायकोला मारलं बावळाटाने.”
तो हसू लागला आणि आश्चर्यचकितही झाला. हे त्याच्या डोक्यातही आलं नव्हतं. कसं येणार? असे उपाय बायकोलाच सुचू शकतात. त्या माणसाला पण हिच्या सारखी बायको असती तर ती वाचली असती.
कमाल आहे आपली. “हिच्याशी लग्न करून आपण फसलो” इथपासून “इतरांना पण हिच्या सारखी बायको मिळावी.” इथपर्यंत आपण पोहोचलो. प्रगती आहे आपली….!
त्याला स्वत:वरच खूप हसू आलं..!
अनामिक
For more short stories like “Gajra (गजरा)“, please visit our Short Stories – लघु कथा.

One thought on “Gajra (गजरा)- A Beautiful Short Story – Marathi Laghu Katha”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *